नाशिक : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात व नियोजनात साधू-महंतांना कोठेही विश्वासात घेतले गेले नसल्याची तक्रार विविध आखाड्यांच्या प्रमुखांनी करण्यास सुरुवात केल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने अखेर महिना अखेरीस बैठक घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी देशभरातील प्रमुख साधू-महंतांना पाचारण करण्यात येणार आहे. आखाडा परिषदेच्या जवळपास सर्वच महंतांनी जिल्हा प्रशासनावर कुंभमेळ्याच्या प्रश्नावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. वर्षावर कुंभमेळा आलेला असताना अद्यापही प्रशासनाने साधू-महंतांना त्यांच्या गरजा व निकड विचारलेली नाही. त्याचबरोबर साधुग्रामसाठी जागा, आखाडे, खालशांना निवारा शेड, पाणीपुरवठा, आरोग्याची सोय, वीज आदिंबाबतीत काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून कुंभमेळ्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रशासन विकासकामांबाबतही विश्वासात घेत नसल्याचे पाहून प्रसंगी कुंभमेळ्यावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा महंतांनी दिल्यामुळे आता प्रशासनाने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच महंत ग्यानदासजी यांच्याशी स्वत: जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी भ्रमणध्वनी-वरून संपर्क साधून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यावर सर्व साधू-महंतांना एकत्र बोलावून बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. येत्या ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात येणार असून, त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित आखाड्यांच्या देशभरातील प्रमुखांना पत्र पाठवून बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत साधू-महंतांच्या अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)