नाशिक : साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या प्लॉटची संख्या जास्त असली तरी त्याचे क्षेत्रफळ कमी असल्याने त्यात खालसे कसे राहतील, असा प्रश्न उपस्थित करीत तांडव केलेल्या साधू-महंतांपुढे प्रशासन अखेर नमले असून, त्यांना अपेक्षित बदल करून देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. यादरम्यानच सोमवारी दुपारी १२ वाजता जागा वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात साधू- महंतांच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.साधुग्रामसाठी यंदा मुबलक जागा असताना प्रशासनाने छोटे छोटे प्लॉट पाडल्याने महंत ग्यानदास संतप्त झाले होते. सातशे खालसे असताना १८०० प्लॉट कशासाठी तयार केले असा प्रश्न करीत आता छोटे प्लॉट एकत्र करण्यासाठी शौचालय उखडून टाकावे लागतील, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेने ३२५ एकर क्षेत्रात साधुग्राम वसवले आहे. याठिकाणी महापालिकेने सुमारे सतराशे ते अठराशे प्लॉट पाडले असून, ते विविध आकाराच्या क्षेत्रफळाचे आहेत. नाशिकमध्ये तीन मुख्य आणि अन्य असे १८ अनि आखाडे असून, त्यांचे सुमारे सहाशे ते सातशे खालसे आहेत. त्यांना साधुग्राममध्ये जागा देण्यासाठी महापालिकेने अशा प्रकारचे प्लॉट पाडले असून, प्लॉटमधूनअंतर्गत रस्ते तसेच प्रत्येक प्लॉटमध्ये शौचालय आणि स्नानगृह बांधण्यात आले आहेत. सदरच्या प्लॉट वाटपासंदर्भात सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर रविवारी पुन्हा महंत ग्यासदास यांच्यासह आखाड्याचे महंत आणि जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम आणि मेळा महेश पाटील आदिंच्या उपस्थितीत हा दौरा करण्यात आला.त्यात स्वच्छतागृहांसाठी सोडलेली जागा, आखाड्यांना दिलेले प्लॉट आणि त्यातील वृक्षांमुळे व्यापलेली जागा याचा परिणाम म्हणून सर्वच आखाड्यांच्या वाटेला कमी जागा येणार असून, त्यात दैनंदिन कार्यक्रम, स्वयंपाकघर, वास्तव्य या गोष्टींसाठी पुरेशी जागा नसल्याने या जागांचे फेरनियोजन करावे, अशी मागणी साधू-महंतांनी केली. त्यानुसार या जागांमध्ये बदल करण्याचे प्रशासनाने मान्य केले. त्यासाठी रस्त्यात येणारे काही स्वच्छतागृह पाडण्यासही परवानगी देण्यात आली. मुख्य रस्त्याच्या सुरुवातीला शौचालय आणि आतील बाजूस आखाड्यांचे प्रवेशद्वार असा प्रकार केवळ नाशिकमध्येच पहायला मिळाल्याचे सांगत ग्यानदास यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोणतीही योजना आखताना आखाड्याच्या प्रतिनिधींना प्रशासनाने विश्वासातच न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यातून प्रत्येक आखाड्याचे प्रवेशद्वार हे रस्त्याच्या समोर असेल, असेही मान्य करण्यात आले. त्यामुळे आता आखाड्यांना जागेचे वाटप करतानाच त्याची पुनर्रचनाही होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
साधुहट्टापुढे प्रशासन नमले
By admin | Updated: July 6, 2015 00:13 IST