नाशिक : शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी आज संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन. डी. पटेल रोडवरील आगार क्रमांक-१ च्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले.एस. टी. कामगारांच्या विविध मागण्या अद्याप शासन व महामंडळाच्या दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासन व महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य एस.टी. कामगार संघटनेच्या वतीने येत्या १२ आॅगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील विविध जिल्ह्यांमधील आगारांसमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. तोट्यातील आगार बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय तातडीने रद्द करावा, कराराची थकबाकीची रक्कम त्वरित मिळावी, सेवानिवृत कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीस मोफत प्रवासाचा पास दिला जावा, राज्यातून एस.टी. बस संपूर्णपणे टोलमुक्त करावी, अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनाने एस.टी.च्या विकासासाठी अनुदानाची तरतूद करावी, या मागण्यांचे निवेदन आगारप्रमुखांना देण्यात आले. यावेळी स्वप्नील गडकरी, सुरेश पेनमहाले, चंदू गोसावी, गिरीश रावत, नितीन चौधरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एस. टी. कामगारांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: July 18, 2014 00:35 IST