पाथर्डी फाटा : शहरातील कचरा गौळाणे रस्त्यावरील महापालिकेच्या खतप्रकल्प केंद्रावर नेऊन टाकला जातो. या केंद्रातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये तयार होणाऱ्या मिथेन वायुने सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पेट घेतला. त्यामुळे या ढिगाऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. शहर परिसरात सकाळपासूनच वारा अधिक वेगाने वाहत होता. त्यामुळे आग रौद्रावतार धारण करण्याची शक्यता वाढल्याने तत्काळ अग्निशामक दलाला प्रकल्पाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून पाचारण करण्यात आले.गौळाणे रस्त्यावरील विल्होळी शिवारात पालिकेचे खतनिर्मिती प्रकल्प कें द्र आहे. पालिकेच्या घंटागाड्यांमार्फत शहरातून संकलित केला जाणारा घरगुती कचरा या ठिकाणी साठविला जातो व त्यावर प्रक्रिया करण्यात येते. साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधील कचरा पहाटेच्या दवबिंदूमुळे आतमध्ये कुजतो व मिथेन वायूची त्याद्वारे निर्मिती होऊन कडक उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने मिथेन पेट घेतो. परिणामी खत प्रक ल्पातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून नेहमीच धुराचे लोट आकाशात उठत असतात, असे येथील तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी (दि.१९) सकाळपासून दुपारपर्यंत शहर व परिसरात वाऱ्याचा वेग वाढलेला होता. परिणामी लागलेली आग ही अधिक तीव्र होण्याचा धोका ओळखून तत्काळ अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सातपूर, सिडको या उपकेंद्रांसह शिंगाडा तलाव येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून प्रत्येकी एक असे तीन मोठे बंब खतप्रकल्पाच्या दिशेने रवाना झाले. जवानांनी पेटलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाण्याचा मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. (वार्ताहर)
खतप्रकल्पामधील कचरा पेटला
By admin | Updated: November 20, 2015 00:04 IST