नाशकातील शहरी तसेच ग्रामीण भागात रौलेट नावाचा जुगार ऑनलाइन फोफावत असताना म्होरक्या पोलिसांच्या गळाला लागल्याने आता नाशिककरांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. दरम्यान, गुरुवारी पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईप्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मागील महिन्यात एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने रौलेट जुगारात लाखो रुपये गमावल्याने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली होती. संदीप दिलीप मेढे (२७, रा.आंबोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील दिलीप नामदेव मेढे (५१) यांनी याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत संशयित कैलास शहा याच्याकडून होणारा त्रास अन् त्याच्या साथीदारांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांनी त्रस्त होत संदीप याने जीवन संपविल्याचे म्हटले. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहा याच्यासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित शहा याच्यासह शांताराम पगार, सुरेश अर्जुन वाघ हे तिघेही फरार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेे शहा यास शिताफीने बुधवारी सापळा रचुून ताब्यात घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचे उर्वरित दोघे फरार साथीदार पगार व वाघ यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यास यश येईल, असा आशावाद अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी यावेळी व्यक्त केला.
--इन्फो
‘रौलेट’ची पाळेमुळे नष्ट होणार?
नाशिक जिल्ह्यात रौलेट या ऑनलाइन जुगाराचे बीज पेरून अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाइन जुगार गेमचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे आता या जुगाराची पाळेमुळे उखडून फेकण्यास पोलिसांना कितपत यश येते, हे नजीकच्या काळात दिसून येईल. या गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुध्द कारवाई केली जाणार असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात रौलेट जुगाराविषयी जर कोणाची तक्रार असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी, असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.