नााशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या अपंग आणि वयस्कर प्रवाशांना फलाटापासून जा-ये करण्यासाठी थेट व्हीलचेअर वापरता येणार आहे. नाशिकच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली असून, त्याचा कुंभमेळ्यात येणाऱ्या सर्वाधिक फायदा होणार आहे. रेल्वेस्थानकाला ८ व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम नुकताच पार पडला असून, या व्हीलचेअरचा वापर होणार आहे.नाशिकरोड रेल्वेस्थानक नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यातच कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांमुळे ते अधिकच महत्त्वाचे ठरणार आहे. दररोज हजारो प्रवासी या रेल्वेस्थानकातून जा-ये करीत असतात. त्यात सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश असतो, परंतु फलाटावरून जाणे-येणे आणि बाहेर पडणे हे गर्दीच्या वेळी अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणीचे ठरते. त्यामुळे अशा प्रकारच्या व्हीलचेअर उपलब्ध झाल्या तर ते सोयीचे होईल, असे रेल्वे प्रशासनाने रोटरीला कळविले होते. या उपक्रमात रोटरी क्लब आॅफ नाशिक नार्थचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी मदत केली त्यानंतर या व्हीलचेअर प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील मध्य रेल्वेचे वाणिज्य अधिकारी गोसावी यांनी या व्हीलचेअरचा अनुरूप वापर आणि त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे आश्वासन रोटरीला दिले. यावेळी डॉ. आवेश पलोड, आर्किटेक्ट विवेक जायखेडकर, उमेश कोठावदे, अशोक कर, सरिता नारंग, ललित बूब, सुप्रिया नाथे, मनोज कल्याणकर, सुहास घारपुरे, प्रीतेश शहा, दिलीपसिंग बेनीवाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानकावर रोटरीच्या व्हीलचेअर
By admin | Updated: August 21, 2015 23:49 IST