नाशिक : शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत नेहमीच साशंक असलेल्या नाशिक महापालिकेला एलबीटी रद्द झाल्यानंतर अनुदानाच्या माध्यमातून दरमहा सहायक अनुदान प्राप्त होत असतानाच शासनाने रस्ते विकास आणि मूलभूत सुविधांसाठी ४ कोटी ६३ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. आर्थिक संकटाशी मुकाबला करणाऱ्या महापालिकेला खारीचा का होईना वाटा अनुदानाच्या रुपात मिळत असल्याने दिलासा लाभणार आहे.शासनाकडून राज्यातील महापालिका व नगर परिषदांना रस्ते अनुदान देण्यात येत असते. यंदा शासनाने त्यासाठी २४५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यात नाशिक महापालिकेला ६३ लाख ४ हजार ७२४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाच्या मोबदल्यात सदर अनुदान दोन हप्त्यात वितरित केले जाणार आहे. सदर अनुदान हे सार्वजनिक ठिकाणीच वापरण्याचे बंधन आहे. या अनुदानाबरोबरच नाशिक महापालिकेला मूलभूत सुविधांसाठीही अनुदान मंजूर करण्यात आले. महापालिकेने मूलभूत सुविधांबाबतचा एखादा प्रकल्प हाती घ्यायचा असून, प्रकल्प खर्चाची किंमत ८ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यातील ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात म्हणजे ४ कोटी रुपये नाशिक महापालिकेला दिले जाणार आहेत, तर उर्वरित ५० टक्के रक्कम ४ कोटी रुपये महापालिकेने स्वनिधीतून खर्च करायची आहे. सध्या स्मार्ट सिटी अभियानाच्या चॅलेंज स्पर्धेत उत्तीर्ण होण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत महापालिकेला सर्वंकष आराखडा केंद्राला सादर करायचा आहे. त्यात मूलभूत सुविधांचाही समावेश आहे. शासनाच्या या अनुदानाच्या माध्यमातून महापालिकेकडून सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी यांसारखा एखादा प्रकल्प हाती घेतला जाऊ शकतो. मात्र चार कोटींच्या अनुदानासाठी महापालिकेला तेवढाच चार कोटी रुपयांचा निधी उभारावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
रस्ते, मूलभूत सुविधांसाठी मनपाला अनुदान
By admin | Updated: November 19, 2015 00:28 IST