दिंडोरी : तीन महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला केलेल्या नाशिक-कळवण रस्त्यावरील अवनखेड पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण उखडत मोठमोठे खड्डे पडत रस्त्याची दुरवस्था झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.नाशिक-कळवण रस्त्यावरील अवनखेड येथील कादवा नदीवर जुन्या अरुंद पुलाला समांतर पूल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाला. परंतु सदर पुलाला जोडणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने तो अवघ्या तीन महिन्यांतच नादुरु स्त झाला होता. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. काही ठिकाणी डांबर गायब होत थेट खालील माती वर आली होती. त्यामुळे त्या पुलावरून वाहतूक काही प्रमाणात बंद होत काही वाहनचालक जुन्या पुलावरून वाहने नेत होती. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे काणाडोळा करत होता. याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त तसेच व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्याची दखल घेत अखेर बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला सर्व रस्ता खोदून चांगल्या पद्धतीने नव्याने रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)
पुलावरील रस्त्याचे काम सुरू
By admin | Updated: July 29, 2016 00:24 IST