नाशिक : सातपूर कॉलनी परिसरात मंगळवारी (दि.२४) भल्या पहाटे एटीएमची जबरी लूट रोखत प्रसंगावधान दाखवून दरोडेखोरांच्या जीपचा दुचाकीने पाठलाग सुरू ठेवला. पोलीस नियंत्रण कक्षाला वेळीच सतर्क करत अतिरिक्त मदत मागून दरोडेखोरांना अटकाव करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सातपूर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी शरद झोले, दीपक धोंगडे हे या थरारनाट्यामधील खरे ‘हिरो’ ठरले. त्यांच्या सतर्कतेमुळेच एटीएमची रोकड तर सुरक्षित राहिली; मात्र दोघा दरोडेखोरांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. त्यांच्या चोख कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रत्येकी २५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सातपूर कॉलनी भागातील आयसीआयसीआय बॅँकेचे एटीएम लुटण्याच्या इराद्याने पाच दरोडेखोर बोलेरो जीपने मंगळवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास आले. एटीएम कक्षात प्रवेश करून एटीएम यंत्र कापून चोरट्यांनी थेट उचलून जीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावेळी परिसरातील काही जागरूक नागरिक व गस्तीवरील बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने चोरट्यांनी जीप घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी बीट मार्शलने तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून अतिरिक्त मदतीचा ‘कॉल’ दिला. तत्काळ नियंत्रण कक्षातून सर्व पोलीस ठाण्यांना ‘अॅलर्ट’ जारी केला गेला अन् भल्या पहाटे दरोडेखोरांच्या जीपचा सिनेस्टाईल पाठलाग नाशिक पोलिसांकडून सुरू झाला. पंचवटीतील हिरावाडी भागात पोलिसांना चोरट्यांना अटकाव करण्यास यश आले. दोघे चोरटे हाती लागले असले तरी त्यांचे अन्य तीघे साथीदार फरार झाले आहेत.