नाशिक : साडेचारशे वर्षांपूर्वी सिंंहस्थ कुंभमेळ्याला मोठी प्रतिष्ठा होती; मात्र ती लुप्त झाल्याने सध्या कुंभमेळा हा केवळ साधूंच्या लढाईचे ठिकाण बनला आहे. पूर्वीच्या कुंभमेळ्यात नीर, नदी व नारी अशा भारतीय संस्कृतीतील तीन महत्त्वांच्या घटकांचा आदर केला जात असे. सिंहस्थाला तीच पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी नद्यांना पुनर्जीवित करा, असे आवाहन प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नाशिककरांना केले. नंदिनी पुनर्भरण समितीच्या वतीने खिमजी भगवानदास आरोग्यभवनात आयोजित ‘नीर, नदी, नारी’ सन्मान कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते रामकुंडावर गोदामातेची आरती करून नाशिक परिसरातील अरुणा, नीलगंगा, नंदिनी, वाघाडी, वालदेवी, कपिला व अहिल्या या सात नद्यांचे कमंडलूत आणलेले पाणी गोदावरीला अर्पण करण्यात आले. तत्पूर्वी, कार्यक्रमात राज्याच्या जलसंवर्धन विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे, भाजपा नेते गोपाळ पाटील, अंजली पाटील, अॅड. मुग्धा सपटणेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. सिंह म्हणाले, भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड वैविध्यपूर्ण देश असल्याने वैचारिक मंथनासाठी पूर्वी कुंभमेळ्याच्या निमित्ताने लोक दर बारा वर्षांनी एकत्र येत, समाजातील वाईट चाली काढून टाकून चांगले नियम तयार करीत. कुंभमेळ्यातूनच पुढील १२ वर्षांची दिशा ठरवली जात असे. स्नानावरून लढाईचा नव्हे, तर शांतीचा संदेश दिला जाई. अगदी अकबर, हुमायूनसारखे मुस्लीम बादशहाही कुंभमेळ्यास उपस्थित राहत. नंतरच्या काळात इंग्रजांनी कुंभमेळा हा फक्त हिंदूंचा धार्मिक उत्सव असल्याचे सांगत त्यात ठरवलेले नियम समाजाला बंधनकारक नसल्याचे सांगितले. तेव्हापासून कुंभमेळ्याची दुर्दशा होत गेली. कुंभमेळ्याला पूर्वप्रतिष्ठा देण्याची यंदा चांगली संधी असून, त्यासाठी नीर, नदी व नारीचा सन्मान करायला हवा. देशातील प्रत्येक नदीचे रक्षण करणे हे संविधानानुसार प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नद्यांना पुनर्जीवित करणे हाच कुंभाचा खरा अर्थ असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ललिता शिंदे, दत्ताजी ढगे, देवांग जानी यांनी मनोगत व्यक्त केले. विशाखा देसले, सोनी जयस्वाल यांनी नृत्याविष्कार सादर केला. गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेश भुसाने यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पंडित यांनी आभार मानले.
नद्यांना पुनर्जीवित करा: राजेंद्र सिंह
By admin | Updated: July 1, 2015 01:41 IST