सिन्नर : शहरासह तालुक्यात स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यासह प्रतिबंधनात्मक उपाययोजना राबविण्याचा निर्णय येथील तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. महसूल, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती या सर्वच खात्यांच्या प्रमुखांसह सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संघटना या सर्वांनीच स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी योगदान देऊन आलेल्या संकटाचा एकत्रितपणे मुकाबला करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.गेल्या चार दिवसांत तालुक्यात स्वाइन फ्लूने तिघांचा बळी घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणेसह महसूल, शिक्षण, पालिका व पंचायत समिती प्रशासन सतर्क झाले आहेत. स्वाइन फ्ूलचा फैलाव रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, मुख्याधिकारी संजय जाधव, गटविकास अधिकारी मधुकर वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. त्र्यंबके, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. कचोरिया आदिंसह विविध खात्यांचे प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. स्वाइन फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन आमदार वाजे व तहसीलदार खैरनार यांनी केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हात देशभरातून भाविक येणार आहेत. त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. जी. एल. पवार यांनी केले. रुग्णांनी सर्दी, ताप व खोकला अंगावर न काढता तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन डॉ. विष्णू अत्रे यांनी केले. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची शिफ्ट वाढविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मास्कचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. डॉक्टरांनी जनसेवा समजून प्रसार रोखावा, असे आवाहन डॉ. अत्रे यांनी केले. पालिका हद्दीत जास्त संसर्ग असल्याने पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेने आणखी सतर्क होण्याची गरज तहसीलदार खैरनार यांनी व्यक्त केली. शहरात २५ हजार स्वाइन फ्लूविरोधी जनजागृती पत्रके छापून वाटप करण्यासह वॉर्डनिहाय फवारणी व स्वच्छता मोहीम राबविणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. रोजच्या कामापेक्षा जास्त प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली जावी, अशी अपेक्षा आमदार वाजे यांनी व्यक्त केली.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. त्र्यंबके यांनी ग्रामीण भागात एक लाख जनजागृती पत्रके व जास्तीत जास्त फ्लेक्स छापून जनजागृती करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यालयात विद्यार्थ्यांना पत्रके वाटप करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना आमदार वाजे यांनी उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स यांना केली. शिक्षण विभागाचे राजीव लहामगे यांनी सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करून जनजागृतीसाठी उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. सर्व ग्रामसेवकांच्या मदतीने प्रत्येक गावात फ्लेक्स व पत्रकांचे वाटप करणार असल्याचे गटविकास अधिकारी वाघ यांनी सांगितले. स्वाइन फ्लूचे संकट रोखण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित काम करावे व केलेल्या कामांचा उपयोग झाला पाहिजे असे योगदान द्यावे, असे आवाहन राजाभाऊ वाजे यांनी केले. बैठकीस नगरसेवक विजय जाधव, मनोज भगत, प्रमोद चोथवे, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. अशोक सोनवणे, डॉ. अभिजित सदगीर, शुभांगी झगडे, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, शैलेश नाईक, दीपक खुळे, नामकर्ण आवारे, डॉ. पंकज नावंदर, डॉ. विजय लोहारकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, शिक्षण, आरोग्य विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
आढावा बैठक : जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यासह फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय
By admin | Updated: February 13, 2015 23:41 IST