नाशिक : शहराबरोबर जिल्ह्णाच्या ग्रामीण भागात डेंग्यूच्या आजाराचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता त्याला वेळीच अटकाव करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. आरोग्य खात्याने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृहावर डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुन्यासंदर्भात महाजन यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, औषधांची उपलब्धता वाढविणे, डास निर्मूलनाचे उपाय करणे आणि आजाराबाबत जनजागृतीसाठी विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात यावेत, जिल्ह्णात डेंग्यू रुग्ण आढळत असल्याने योग्य औषधोपचारावर लक्ष द्यावे. यावेळी नाशिक विभागातील ४५ गावे संवेदनशील आहेत, त्यात नाशिक जिल्ह्णातील २४ व नगर जिल्ह्णातील १५ गावांचा समावेश आहे. जानेवारी ते आॅगस्ट य कालावधीत विभागातील २६१४ रुग्णांचे रक्त नमुने तपासले असता ८३२ नमुने पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. नाशिक शहराबरोबरच जिल्ह्णातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड व नांदगाव हे तालुके संवेदनशील असून, आरोग्य यंत्रणांकडून आवश्यक उपाय केले जात आहे, अशी माहितीही देण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, शल्य चिकित्सक डॉ. सुनील जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदि उपस्थित होते. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महापालिकेच्या वतीने विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तपासणी कक्ष वाढविणे, औषधांचा पुरेसा साठा राखणे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध राहावेत अशा सूचना देण्यात आल्या. डास नियंत्रणासाठी स्वच्छता, धूर फवारणी व कचरा राहू नये यासाठी घंटागाडीचा वापर वाढवा, असेही यावेळी सांगण्यात आले.
डेंग्यू, मलेरियाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
By admin | Updated: September 22, 2016 01:09 IST