मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील पंचाळे-देवपूर रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी थांबलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना अटक झाली आहे. आरोपींना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवारी रात्री देवपूरचे मंडल अधिकारी शरद नंदराम देशमुख, वडांगळीचे तलाठी पांडुरंग काशीनाथ गोळेसर, देवपूरचे तलाठी संतोष प्रभाकर सोनवणे हे तिघे पंचाळे-देवपूर रस्त्यावर थांबले होते. यावेळी सफेद रंगाच्या चारचाकीतून आलेल्या व तोंडावर कापड बांधलेल्या चौघा हल्लेखोरांनी गौण खनिज प्रतिबंधक पथकाच्या या कर्मचाऱ्यांना लाकडी दांडके व लोखंडी गजाने मारहाण केली होती. या प्रकरणी तलाठी सोनवणे यांनी हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी देवपूर परिसरातील वस्तीवर लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे, हवालदार देवीदास लाड, सुनील जाधव, तुषार मरसाळे, तुळशीराम चौधरी, दत्तू खतीले, राम भवर, लक्ष्मण बदादे, नंदू कुऱ्हाडे यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी संशयित बबन जगताप (२२), विजय जगताप (२६) दोघेही रा. देवपूर व तुळशीराम खैरनार (२६), रा. रामपूर, ता. सिन्नर या तिघा आरोपींना ताब्यात घेतले होते.(वार्ताहर)
महसूल अधिकाऱ्यांना मारहाण
By admin | Updated: October 18, 2015 22:52 IST