मालेगाव : येथील ग्रामीण पोलीस दलात ‘पोलीसमित्र’ शोधताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नियमित कामांबरोबर तपास कामावर परिणाम झाल्याचे बोलले जाते. पोलीस महासंचालकपदी प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या लौकिकास साजेल असे काम करण्यास सुरुवात केली. यात त्यांनी विभागाला शिस्त लावण्याबरोबरच पोलिसांपासून लांब गेलेल्या जनसामान्यांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा व त्यातून पोलिसांना मदत होऊन आवश्यक ती माहिती मिळावी या हेतूने ‘पोलीसमित्र’ ही संकल्पना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत २०० ते २५० पोलीसमित्र तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशावर काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र यात मालेगाव परिसरात अनेक अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांना पोलीसमित्र शोधताना अनेकांची मनधरणी करावी लागत आहे. मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळे सर्वसामान्य ही नसती ब्याद नको म्हणून लांब राहत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास घाबरतात. पोलिसांचे गुन्हेगारांशी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांशी असलेले संबंध अनेकवेळा उघड झाले आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक प्रकरणात माहिती देणाऱ्यांची नावे उघड झाली आहेत. त्यात काही मदत करणाऱ्यांवर आकसापोटी पोलीस अधिकाऱ्यांनी हकनाक गुन्हे दाखल केल्याचे तसेच काहींना तुरुंगात टाकल्याचे प्रकार घडलेले आहेत. अशा परिस्थितीत पोलीसमित्र मिळणार कसे? मिळालेच तर अधिकाऱ्यांविषयी खात्री नसल्याने कर्मचारीही हातचे राखून काम करीत आहेत. यात काहींना बळजबरीने मित्र बनविण्यात आल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी मोहल्ला कमिटीचे नामकरण करण्यात आल्याचीही चर्चा आहे. अनेक पोलीस ठाण्यात असे अनेक मित्र तयार झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांनी तयार केलेल्या मित्रांपैकी किती मित्र काम करतील हे येणारा काळच ठरवेल. या सर्वांचा परिणाम नियमित कामांबरोबरच तपास आदि पोलीस कामांवर झाला आहे. पोलीसमित्र ही संकल्पना साकार करण्यासाठी पोलिसी कारवाईची भीती नष्ट करून विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी पोलिसांनी कायद्याची भाषा सोडून सर्वसामान्य नागरिकांसारखे वागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
कामावर परिणाम
By admin | Updated: November 25, 2015 22:11 IST