योगेश सगर ल्ल कसबे-सुकेणेएचएएल कारखाना उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या कसबे-सुकेणे रेल्वेस्थानकापासून ओझर (मिग) पर्यंत ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करण्यात आला होता. परंतु एचएएल कारखाना उभारणीनंतर हा रेल्वेमार्ग वापराविना बंद अवस्थेत असून, जमीन मात्र मध्य रेल्वेच्या ताब्यात आहे. या रेल्वेमार्गाचा वापर करा नाही तर जमिनी मूळ मालक शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीपक पगार, सोमनाथ बोराडे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, निफाड तालुकाध्यक्ष सोमनाथ बोराडे, जगदीश इनामदार यांनी हा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांच्याकडे मांडला. शेट्टी यांनी याबाबत तत्काळ दखल घेत रेल्वेमंत्री प्रभू आणि कृषिमंत्री सिंह यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा घडवून आणली. यावेळी सोमनाथ बोराडे यांनी हा रेल्वेमार्ग सध्या बंद असून, या मार्गावर अतिक्रमण होत आहे. रेल्वे प्रशासनाने हा मार्ग ओझर कार्गो विमानतळासाठी वापरावा किंवा कसबे-सुकेणे-ओझर-वणी-सापुतारा-सूरत रेल्वेमार्ग करावा, अशी मागणी केली. जर ते शक्य नसेल तर रेल्वेमार्गाची जमीन मूळ मालकांना परत करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.
ओझर रेल्वेमार्गाच्या जमिनी परत करा
By admin | Updated: January 19, 2016 22:58 IST