वणी : ग्रामपंचायत हद्दीतील वनक्षेत्रात कोणीही अवैध वृक्षतोड केल्याचे आढळल्यास त्याच्यावर ५० हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा ठराव भातोडे ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा व नैसर्गिक वनसंपत्तीचे रक्षण व्हावे या उद्देशाने ठराव करण्यात आला.दिंडोरी तालुक्यात भातोडे, धरम बरडा ही दोन गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत असून, नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत. भातोडे ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाचे २०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र असून, त्यात कोट्यवधींची वनसंपदा आहे. विविध दुर्मीळ वृक्ष, आयुर्वेदिक वनस्पती, फळे व फुलझाडे यांचा वनसंपदेत समावेश आहे. गेल्या काही काळात येथे काही व्यक्तींनी वृक्षतोड करून लाखोंची वनजमीन लाटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराविरोधात भातोडे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दादही मागितली होती. त्याची चौकशी वनविभागाकडून संथगतीने सुरू आहे. (वार्ताहर)दरम्यान प्रशासकीय स्तरावर कारवाई होईल तेव्हा होईल मात्र वनसंपत्तीच्या रक्षणासाठी भातोडे ग्रामस्थ सरसावले असून त्यांनी हा ठराव केला आहे. ठरावाच्या प्रती बाबापुर, चंडिकापुर, टेकाडी, मार्कड पिंपरी, विश्रामपाडा, मांदाणे, मुळाणे भागात वितरीत करण्यात आल्याची माहिती वन संरक्षण समितीचे सदस्य दशरथ महाले, किरण महाले यांनी दिली.
वृक्षतोडी विरोधात ग्रामसभेत ठराव
By admin | Updated: September 1, 2015 22:16 IST