सिन्नर : पालिकेने विकास आराखड्यात क्रीडांगणाच्या आरक्षणासाठी महानुभाव स्मशानभूमीची जागा आरक्षित केली आहे. सदर जागा महानुभाव पंथीयांची दफनभूमी असून पालिकेने त्या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण तातडीने रद्द करावे, अशी मागणी महानुभाव पंथीयांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात केली आहे. येथील सर्व्हे नंबर १०३३ (१२७७) यातील ०.३४ आर पोटखराबा ही मिळकत महानुभाव पंथीय दफनभूमीची जागा आहे. ही मिळकत पूर्वी सन १९३९ साली नोंद नं. २४९८ नुसार स्मशानभूमीकडे वर्ग केली असून त्यानुसार सात-बारा उताऱ्यावर भोगवटदार म्हणून शेरा मारला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तेव्हापासून या जागेवर मृतदेहाचे दफन केले जाते. असे असताना पालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात सदरची मिळत ही खेळाच्या मैदानाकरिता आरक्षित केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने सदरच्या मिळकतीबाबत कोणतीही चौकशी न करता व पूर्वीची कागदपत्रे विचारात न घेता सदर कार्यवाही केल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर मिळकतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही चौकशी अहवाल न घेता सदर मिळकत ही स्मशानभूमीकरिता वापरू नये असे आदेश दिले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सदर मिळकतीवरील आरक्षण रद्द करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर मिळकत महानुभाव पंथीय लोकांच्या दफनभूमीसाठी असून त्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचे म्हटले आहे. या मागणीचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांना देण्यात आले. निवेदनावर गोपाळ महानुभाव, वैभव महानुभाव, गोविंद महानुभाव, घनश्याम महानुभाव, अर्जुनराज सुकेणकर, संदीप महानुभाव, शारदा आव्हाड, फुलचंद लासूरकर, उत्तम गिते, बाळकृष्ण सदगीर, सचिन सांगळे, कविता कराड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत
क्रीडांगणाच्या आरक्षणाला विरोध
By admin | Updated: February 6, 2016 22:10 IST