नाशिक : पंचवटी हद्दीतील क्रांतीनगर, वृंदावन कॉलनी, हनुमानवाडी परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रात्रीच्या सुमारास टवाळखोर धुमाकूळ घालत असल्याने परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. रात्री परिसरात येऊन दहशत निर्माण करणाऱ्या या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यास पोलीस असर्थ ठरत असल्याने अखेर नागरिकांनीच आता रात्रीचा पहारा देण्यास सुरुवात केली आहे. शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वार काढले असून, गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. गंभीर गुन्ह्यांबरोबरच चोरी, लुटमारी आणि दहशत पसरविण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पंचवटीतील क्रांतीनगर येथे रात्रीच्या सुमारास टवाळखोर परिसरात दहशत माजवित आहेत. परिसरातील रहिवाशांच्या घराच्या कड्या वाजविणे, दुचाकीमधील पेट्रोल काढून घेणे, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना मारहाण करणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. रात्री एक ते तीन वाजेच्या दरम्यान टवाळखोर परिसरात दाखल होऊन परिसरातील घरांना, वाहनांना टार्गेट करतात. घरांवर दगडफेक करणे, वाहनांचे पेट्रोल काढणे, वाहने ढकलून देणे अशा घटनांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. टवाळखोरांच्या या उपद्रवामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून, संपूर्ण परिसर हा दहशतीखाली आहे. यासंदर्भात नागरिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र पोलिसांकडून गांभीर्य दाखविले जात नाही. पोलिसांनी परिसरात गस्त वाढविणे अपेक्षित असतानाही पोलिसांकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांनी पाठ फिरविल्यामुळे आता नागरिकांनीच गस्त घालविण्याचा निर्णय घेतला असून, स्वत:च्या बचावासाठी नागरिकांना गुंडांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली आहेत. शिवाय गस्तीवर असलेल्या स्थानिक नागरिकांनाही धोका असल्याने संपूर्ण परिसरच चिंतेत आहे. (प्रतिनिधी)
क्रांतीनगरचे रहिवासी भयभीत
By admin | Updated: October 4, 2015 22:37 IST