नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचे पिण्यासाठी तसेच उद्योग व सिंचनासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता शनिवारी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जायकवाडी धरणासाठी गंगापूर, दारणा समूहातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेता त्याचे पडसाद या बैठकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनालाही या विरोधाची भीती वाटू लागल्याने बैठक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर येत आहेत व त्यातही त्यांनी पाण्याच्या आरक्षण निश्चितीसाठी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक बोलविली आहे. जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गंगापूर व दारणा धरण समूहांतर्गत येणाऱ्या गावांना नजीकच्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून, शेतीसाठी आवर्तनच मिळणार नसल्याने शेतकरी आत्तापासूनच हवालदील झाले आहेत. या साऱ्या परिस्थितीस राज्य सरकार व पर्यायाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. जलसंपदामंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या खात्यावरच सारा रोष असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विरोधकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून बैठकीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.
धरणांच्या पाण्याचे आज आरक्षण
By admin | Updated: November 21, 2015 00:14 IST