गोकुळ सोनवणे : सातपूरसहा झोपडपट्ट्या आणि गावठाण अशा सातपूर प्रभाग क्रमांक ११ मध्ये उमेदवारी देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. मनसेचे विद्यमान स्थायी सभापती सलीम शेख या प्रभागातून निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या विरोधात शिवसेना, भाजपासह सात उमेदवार रिंगणात आहेत. पक्षाची उमेदवारी न मिळालेले बंडखोरदेखील रिंगणात उतरले आहेत.अनुसूचित जमाती (ब) गटात मनसेचे योगेश शेवरे, शिवसेनेचे सुभाष गुंबाडे, भाजपाचे विठ्ठल लहारे, माकपाचे माधव पुराणे, बसपाचे विजय बेंडकुळे, रिपाइंचे अमित मांडवे, राष्ट्रवादीचे लक्ष्मण म्हसे, भारिपचे पांडुरंग डगळे आदि आठ राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात असून, या जागेसाठी कोणीही अपक्ष उमेदवार नाही. अनुसूचित जाती महिला (अ) गटात तब्बल ११ उमेदवार रिंगणात आहेत. यात विद्यमान प्रभाग सभापती मनसेच्या उमेदवार सविता काळे यांच्यासह बसपातर्फे माजी नगरसेवक ज्योती शिंदे, शिवसेनेच्या रूपाली गांगुर्डे, रिपाइंच्या दीक्षा लोंढे, माकपाच्या सिंधू शार्दूल, राष्ट्रवादीच्या कुंदा अहिरे, भारिपच्या ललिता जाधव, बहुजन रिपब्लिकन सोशिलस्ट पार्टीच्या संगीता शेळके, अपक्ष वृषाली अहिरे, रिता जगताप, शशिकला जगताप आदि उमेदवार रिंगणात आहेत. सर्वसाधारण महिला (ड) गटातदेखील तब्बल १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या सीमा गोकूळ निगळ, मनसेच्या अलका निगळ, बसपाच्या माजी नगरसेवक सुजाता काळे, भाजपाच्या माधुरी काळे, माकपाच्या मंगल पाटील, भारिपच्या रमा सरकटे, राष्ट्रवादीच्या स्वाती माने यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर उमेदवार जयश्री धोत्रे आदिंसह पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारी वाटपावरून बराच गदारोळ झाला होता. त्यात फक्त तीनच उमेदवार देऊन भाजपाने नामुष्की ओढवून घेतली आहे, तर भाजपाने उमेदवारी नाकारली म्हणून नितीन निगळ यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून जयश्री धोत्रे यांनीही बंडखोरी केली आहे, तर मनसेचे स्थानिक पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश घेऊन पत्नी रूपाली गांगुर्डे यांची उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्या असलेल्या कुंदा अहिरे यांनीही भाजपा सोडून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेना असा सरळ सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रतिष्ठा आणि वर्चस्वाची लागणार कसोटी
By admin | Updated: February 15, 2017 00:06 IST