लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्णात जून महिन्यात पावसाने दमदार लावलेली हजेरी अद्याप कायम असली तरी बागलाण, नांदगाव, मालेगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. महिनाभरात साधारणत: शंभर मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर सुरू करण्यास अनुमती असल्याने ४९ वाड्या व ५६ गावांमधील टॅँकर बंद करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी होऊ लागल्याने प्रशासनाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईग्रस्त गावांची सद्यस्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत.सदरचे टॅँकर सुरू ठेवावेत, असा प्रस्ताव संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहेत. जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच गेल्या वर्षापेक्षा अधिक पाऊस झालेला असतानाही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याची बाब जिल्हा प्रशासन अद्यापही मानायला तयार नसल्याने त्यांची खात्री करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागास पत्र देऊन जिल्ह्णातील पाण्याच्या पातळीचा अहवाल मागविला आहे. या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा
By admin | Updated: July 4, 2017 00:37 IST