वणी : शिवारातील शेतजमिनीतील गोठ्यालगतच्या परिसरात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा हजेरी लावली. शनिवार व रविवार अशा सलग दोन रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट पसरली असून, वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. मात्र निफाड तालुक्यात नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तेरा पिंजरे लावल्याने पिंजरा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर गणेश देशमुख यांच्या गुरांच्या गोठ्यात भक्ष्य शोधण्याच्या इराद्याने बिबट्या व त्याची दोन बछडे शिरली. देशमुख कुटुंबीयांनी त्यांना पिटाळून लावले. रविवारी सकाळी वन विभागाने घटनास्थळी जाऊन बिबट्याचे व बछड्याच्या पायाचे ठसे घेतले. तद्नंतर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिबट्या याठिकाणी आला. पुन्हा त्याला हुसकावण्यात आले. सोमवारी सकाळी वन विभागाचे अधिकारी वाडेकर यांना ही माहिती देऊन पिंजरा लावण्याची मागणी देशमुख यांनी केली. मात्र निफाड तालुक्यात नरभक्षक बिबट्याला पकडणासाठी तेरा पिंजरे लावल्याने पिंजरा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी रमेश देशमुख यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने ठार केले होते. (वार्ताहर)
वणीत बिबट्याची पुन्हा हजेरी
By admin | Updated: September 21, 2015 22:58 IST