नाशिक : ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ असा सुखद अनुभव महापालिकेच्या विविध कर विभागाला सोमवारी (दि.२६) आला. टिळकवाडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या ठिकाणी अवघ्या ५ बाय ५ फुटाच्या जागेत स्विमिंग सूट विक्री साठी झालेल्या लिलावात एका विक्रेत्याने मासिक तब्बल ४३ हजार ४०० रुपये भाडे देण्याची बोली बोलली आणि कर विभागाचेही अधि कारी या अभूतपूर्व प्रतिसादाने चक्रावून गेले. विविध कर विभागाने महापालिकेच्या मालकीच्या चारही जलतरण तलावाच्या ठिकाणी जल तरणासाठी लागणाऱ्या पोशाखांची विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी ५ बाय ५ फुटाच्या जागेचे मासिक भाडे आकारले जाते. यापूर्वी, सदर जागा भाडे १५०० रुपये आकारले जायचे. यंदाही जलतरण तलावावरील सदर जागेत स्विमिंग सूट विक्रीसाठी लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी १५०० रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली. टिळकवाडी येथील स्वातंत्र्यवीर जलतरण तलावाच्या ठिकाणी असलेल्या जागेसाठी झालेल्या बोली प्रक्रियेत ६ विक्रेते सहभागी झाले होते. त्यातील तीन जणांनी अखेरपर्यंत बोली प्रक्रियेत सहभाग नोंदविला. लिलावाची बोली इतकी टोकाला पोहोचली की, अखेर ४३ हजार ४०० रुपयांवर बोली येऊन थांबली आणि १५०० रुपयांच्या ठिकाणी महापालिकेला दरमहा ४३ हजार ४०० रुपये भाडे मिळणे निश्चित झाले. सदर बोली बोलण्यासाठी तीन विक्रेत्यांमध्ये स्पर्धा दिसून आली. सदर लिलाव घेणाºया संबंधित विक्रेत्याला आता चार महिन्यांसाठी १ लाख ७२ हजारासह त्यात जीएसटीची भर घालत सुमारे २ लाखाहून अधिक भाडे मोजावे लागणार आहे. जलतरणाच्या पोशाख विक्रीतून संबंधिताला आता किमान २ लाखाच्या वर व्यवसाय करणे भाग पडणार असून, त्याला या बोलीचा लाभ पदरात पडू शकणार आहे.अन्य ठिकाणी अल्प प्रतिसादमहापालिकेने सावरकर जलतरण तलावाप्रमाणेच नाशिकरोड, सातपूर, सिडको येथील जलतरण तलावाच्या ठिकाणीही पोशाख विक्रीकरिता जागा देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली. परंतु, नाशिकरोड येथील जलतरण तलावातील जागेसाठी २३०० रुपये तर सिडकोतील जलतरण तलावातील जागेसाठी २५०० रुपये बोली आली. सातपूर येथील जलतरण तलावाच्या ठिकाणी एकही विक्रेता पुढे आला नाही. मात्र, सावरकर जलतरण तलावाच्या छोट्या जागेसाठी मोठी कमाई झाल्याने कर विभाग सुखावला गेला शिवाय चक्रावलादेखील.
स्विमिंग सूट विक्रीसाठी ४३,४०० रुपये भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:15 IST