नाशिक : महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. या कामांची पाहणी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी बुधवारी (दि.२३) केली. यावेळी, कालिदास कलामंदिरचे काम मुदतीत व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी ९ कोटी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यानुसार, दि. १६ जुलैपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झालेली आहे. नूतनीकरणाच्या कामांची सद्यस्थिती पाहण्यासाठी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांचेसह सदस्य जगदीश पाटील, सय्यद मुशीर, श्याम बडोदे, मुकेश शहाणे यांनी दौरा केला. यावेळी, कालिदास कलामंदिराच्या हटवण्यात आलेल्या जुन्या खुर्च्या, जुने इलेक्ट्रिक साहित्य यांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. कालिदास कलामंदिरचे प्रवेशद्वार अधिकाधिक आकर्षक करण्यावर भर देण्याचीही सूचना करण्यात आली तसेच स्थानिक रंगकर्मींनी सुचविलेल्या सूचनांचा कशापद्धतीने नूतनीकरणाच्या कामात अंतर्भाव करता येईल, याबाबतही विचार करण्याची सूचना देण्यात आली. कालिदास कलामंदिरचे काम लवकरात लवकर पूर्ण करत ते रंगकर्मींसाठी खुले करण्यात यावे, असे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले.आॅनलाइन बुकिंगवर भरकालिदास कलामंदिरचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर कालिदासचे बुकिंग आॅनलाइन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सभापती शिवाजी गांगुर्डे व सदस्य जगदीश पाटील यांनी सांगितले. सध्या काही मक्तेदारांचीच बुकिंगसाठी मक्तेदारी असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यापुढे त्याचे नियंत्रण पूर्णपणे महापालिकेच्या हाती असणार असल्याचेही सभापतींनी सांगितले.
‘कालिदास’चे नूतनीकरण; स्थायी समितीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:21 IST