---
मनपाच्यावतीने वृक्ष छाटणी
नाशिक- महापालिकेच्यावतीने शहरात वृक्ष छाटणी सुरू करण्यात आली असून, राजीव गांधी भवन आणि परिसरात सध्या ही कामे सुरू आहेत. पथदिव्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे दिव्यांवरील प्रकाशाला अडथळा येत असल्याने दिवे लावून उपयोग होत नाही. त्यामुळे महापालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
--
मनसेच्यावतीने जल्लोष
नाशिक- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांनी नाशिक शहरात जल्लोष केला. ठक्कर बाजार येथील मनसेच्या कार्यालयाच्या जवळ कोदंडधारी प्रभु श्रीराम चंद्रांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडून आणि प्रभु श्रीरामाचे खरे पाईक, मनसैनिक, मनसैनिक अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सुजाता डेरे, पराग शिंदे, मनोज घोडके, संताेष कोरडे, राकेश परदेशी, संजय देवरे, अमित गांगुर्डे, निखिल सरपेातदार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
----
राज्यपाल कोश्यारी यांना अभिवादनासाठी निमंत्रण
नाशिक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकाला हक्काची जाणिव करून देण्यासाठी १९३० मध्ये नाशिकमध्ये पंचवटीत श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. यंदा २ मार्च रोजी या सत्याग्रहाला ९१ वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थित राहावे, यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले. माजी आमदार भाई गिरकर, रिपाइंचे नेते किशोर घाटे, अरूण डांगळे, उदय गांगुर्डे, दामोधर जगताप, प्रवीण नेटावणे व राजेंद्र गमे यांनी हे निमंत्रण दिले. डॉ आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहात पाच वर्षे ७ महिने ११ दिवस चाललेले हे मोठे आंदोलन हेाते. त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली.(छायाचित्र आर फोटोवर २९ काेश्यारी)
----
रस्त्याची दुरवस्था;नागरिकांचे हाल
नाशिक- पारिजात नगर ते वनविहार कॉलनी या दरम्यान जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याठिकाणी त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पारिजात नगर सिग्नलजवळच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने तेथे दुुचाकीचे अपघात होतात. त्यामुळे महापालिकेने तातडीने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---
बस सेवा बंद; प्रवाशांचे हाल
नाशिक- महापालिकेची बससेवा सुरू होणे लांबणीवर पडले आहे आणि दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाने मोजक्याच फायद्याच्या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोरोनाचे संकट कमी होऊ लागल्याने आता खासगी आस्थापनांबराेबरच शाळा, महाविद्यालयेदेखील सुरू होऊ लागली आहेत; मात्र बस सेवा बंद असल्याने त्यांची अडचण होत आहे.