नाशिक : शहरातील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असतानाही रुग्णांना ते मिळत नसतील, रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असेल तर छावा क्रांतीवीर सेना अशा काळाबाजार करणाऱ्यांना छावा स्टाईल धडा शिकवेल, असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेने दिला आहे.
छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिकमधील बेडची लपवालपवी करणारी रुग्णालये, तसेच रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असताना या रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडसाठी वणवण करावी लागत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना तासनतास मेडिकलबाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे. तासनतास प्रतीक्षा करूनही हे इंजेक्शन मिळत नाही तर काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा किमतीने विक्री होत असल्याने छावा क्रांतीवीर सेनेने याविरोधात आक्रमक पवित्रा घेत अशी रुग्णालये व औषध विक्रेत्यांना छावा स्टाईल धडा शिकवला जाईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक करण गायकर, युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग, जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी दिला आहे. दरम्यान, प्रशासनही आता अशा गोष्टींवर अंकुश ठेवायला कमी पडत असल्यानेच संघटनेला अशाप्रकारची आक्रमक भूमिका घ्यावी लागत असल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.