नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून दुष्काळग्रस्त गावांसाठी गुरुवारी (दि. २४) पहाटे ५ वाजेच्या सुमारास बिगर सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना ६२ दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक साठवण बंधाऱ्यात सोडण्यात येणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात परिसरातील पाणीटंचाई मिटणार आहे.तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणातून यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी साठवण बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई व धरणातील पाणीसाठा लक्षात घेता बिगर सिंचनाचे आवर्तन देणे शक्य असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांना ६२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नांदूरशिंगोटे व भोजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आवर्तनासंदर्भात चर्चा केली होती. सोमवारीच आवर्तन सुटणार होते. परंतु पाणीपट्टी न आल्याने पाणी सोडण्यास दोन दिवस उशीर झाला आहे.या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे ३५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दोडी कालव्यावरील शेवटच्या भागातील शिवाजीनगर व नांदूरशिंगोटे कालव्यावरील निमोण भागाला प्रथम पाणी पोहोचणार असून, ६ ते ७ दिवस आवर्तन सुरू राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. परिसरातील पाझर तलावांमध्ये पाणी येणार असल्याने पाणीटंचाई तात्पुरती दूर होणार आहे.भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. दोन्ही योजनांसाठी धरणात मृतसाठ्यासह ७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. सात महिने २१ गावांची तहान उर्वरित पाण्यावर अवलंबून राहणार आहे. (वार्ताहर)
दुष्काळग्रस्त गावांना दिलासा
By admin | Updated: December 24, 2015 23:56 IST