नाशिक : कुंभमेळ्याची कामे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत अडकू नये यासाठी शासनाने निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेण्याची तयारी केली खरी; परंतु प्रत्यक्षात मात्र आयोगाकडून अशा प्रकारे कोणतीही मंजुरी देण्यात आली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता महिनाभराच्या कालावधीनंतरच ही कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.पुढील वर्षी जुलै महिन्यापासून सिंहस्थ कुंभमेळा सुरू होत आहे. सदरच्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधांची कामे मंजुरी आणि निधी उपलब्धता यावर अवलंबून आहेत. निधी येईल त्याप्रमाणे कामे होत असली, तरी मध्यंतरी लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्याने कामे खोळंबली होती. त्यानंतर दोन महिने होत नाही तोच विधानसभा निवडणूक होत असून, त्यामुळे पुन्हा आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची कामे रखडू नये यासाठी काही कामांची यादी करून राज्य शासनाने निवडणूक आयोगाला सादर केली होती. यात नाशिक महापालिकेच्या कामांचाही समावेश होता; परंतु अद्याप कोणत्याही कामासाठी मंजुरी मिळाली नसल्याचे वृत्त आहे. अर्थात, महापालिकेचा कुंभमेळ्यासाठी १०५२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. त्यापैकी पावणेसातशे कोटी रुपयांची कामे सुरू असून, मंजुरीअभावी पालिकेचे कोणतेही काम रखडणार नाही. कारण आवश्यक कामांना अगोदरच प्रारंभ झाला असून, आता उर्वरित कामे जानेवारी २०१५ पासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कुंभमेळा कामांसाठी आयोगाचा नकारच
By admin | Updated: September 27, 2014 00:10 IST