नशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी पर्वणीचे फेरनियोजन करण्याचे ठरविणाऱ्या प्रशासनाने फक्त नाशिकरोडला येणाऱ्या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविले. त्यामुळे दुसऱ्या पर्वणीला तरी पोलीस बॅरिकेडिंगचे भय कमी होईल अशी आशा बाळगून असलेल्या शहरवासीयांच्या पदरी निराशाच पडली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आली. या बैठकीच्या प्रारंभीच पहिल्या पर्वणीला भाविकांची गर्दी होती, परंतु दुसऱ्या पर्वणीला चारपट भाविक येण्याची शक्यता विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी व्यक्त केली व पहिल्या पर्वणीच्या नियोजनात राहून गेलेल्या उणिवा दूर करण्यासाठी तसेच नागरिकांच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी बैठक बोलविण्यात आल्याचे जाहीर केले. लोकप्रतिनिधींच्या सूचना व पहिल्या पर्वणीच्या काळात ज्या काही बाबी लक्षात आल्या त्यावरून प्रशासनाने काही बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यात नाशिकरोडच्या भाविकांची झालेली पायपीट कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले नियोजन त्यांनी सांगितले त्याचबरोबर शहरातील दुचाकी वाहनांसाठी इदगाह मैदान, डोंगरे वसतिगृह आदि ठिकाणी पार्क करता येतील काय या दृष्टीने चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले.
फेरनियोजनात किरकोळ दिलासा
By admin | Updated: September 4, 2015 00:01 IST