लोकमत न्यूज नेटवर्क :सिडको : महापालिकेच्या विद्युत विभागातील पथदीप देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर तसेच सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशी कामावर हजर राहूनही गेल्या वर्षभरापासून जादा कामाचा मोबदला दिला नसल्याने कर्मचारी हे आता कार्यालयीन वेळेनंतर कामकाज करीत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. महापालिकेच्या सिडको तसेच इतर सर्व विभागांतील विद्युत विभागात पथदीप देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर तसेच सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशी कामावर हजर राहून काम करावे लागते. परंतु या कर्मचाऱ्यांना गेल्या आॅगस्ट २०१६ पासून जादा कामाचा मोबदला दिला नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी विद्युत खांबावर शॉर्टसर्किट होणे, खांबांमध्ये करंट उतरणे, लाइट फॉल्ट होणे असे प्रकार नियमित होत असताना याबाबतही मनपाकडून कोणतीही योग्य ती दखल घेतली जात नसल्याने कर्मचारी हे रामभरोसे कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे. पथदीप दुरुस्तीचे काम हे जोखमीचे असल्याने काम करताना दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेनंतर व सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी व जादा कामाचा मोबदला देण्यासाठी लेखी आदेश असावे, असेही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. कामकाज करताना एखादी दुर्घटना घडली तर जखमींवर तत्काळ उपचार करावे लागते. परंतु याबाबतही मनपाकडे कोणतीही उपाययोजना असल्याचे दिसून येत नाही. जादा कामाचा मोबदला मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांचीदेखील भेट घेतली. परंतु अद्यापही कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबदला मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी गेल्या जून महिन्यापासून कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त कामकाज करत नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
‘अंधारात’ मनपा विद्युत कर्मचाऱ्यांचा काम करण्यास नकार
By admin | Updated: July 3, 2017 18:42 IST