नाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या शिक्षणसेवक भरतीत केवळ अनुसूचित जमातीतील उमेदवारांना भरती करण्यात येणार असल्याने त्या विरोधात अन्य संवर्गातील सर्व उमेदवारांनी नाराजी व्यक्त करून या अन्यायकारक भरती विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे कंत्राटी स्वरूपात व तासिकेवर काम करणाऱ्या आदिवासी विकास विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनीही, आदिवासी विकास विभागाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून, आमचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. जानेवारी २०१४ मध्ये आदिवासी विभागात नाशिक, अमरावती, ठाणे व नागपूर या चारही विभागांकडून गृहपाल, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, निरीक्षक, प्राथमिक शिक्षणसेवक, माध्यमिक शिक्षणसेवक अशा विविध पदांकरिता आॅनलाइन अर्ज भरून घेतले आहेत. पदांची लेखी परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. परंतु शिक्षणसेवक पदाकरिता लेखी परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. जानेवारी २०१४ मध्ये आदिवासी आश्रमशाळा शिक्षणसेवक पदाकरिता प्रकाशित केलेली सर्व संवर्गाकरिता असलेली जाहिरात रद्द करून सुधारित जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, या सुधारित जाहिरातीनुसार शिक्षणसेवक पदासाठी स्थानिक उमेदवारच, तसेच फक्त अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारच या पदाकरिता पात्र असेल, असे स्पष्ट करण्यात आले असून, त्यामुळे अन्य संवर्गातील उमेदवारांवर हा अन्याय असल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे.
शिक्षणसेवक भरतीप्रक्रिया अन्यायकारक उमेदवारांचा आरोप, न्यायालयात जाणार
By admin | Updated: February 24, 2015 01:52 IST