नाशिक : महापालिकेच्या विविध पाच विभागातील ६३५ पदे भरण्यास मान्यता दिल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना श्रेय दिले आहे. दोन ते तीन वेळा त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषय मांडून पाठपुराव्याचे अश्वासन दिले होते, असे महापौरांनी स्पष्ट केले असून त्यामुळे शिवसेनेचा मुखभंग झाला आहे. नाशिक महापालिकेचा आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पडून आहे. त्यातील वैद्यकीय, अग्निशमन दल, लेखा व लेखापरीक्षण, घनकचरा व्यवस्थापन तसेच अभियांत्रिकी विभागातील पदे भरणे अति तातडीचे असल्याने किमान त्याला मान्यता मिळावी यासाठी महापालिकेचा आग्रह सुरू होता. आता शासनाने पाच विभागातील ३७ संवर्गातील ६३५ पदे भरण्यास मान्यता दिल आहे.
नाशिक महापालिकेत गेल्या २० ते २२ वर्षांपासून भरती झालेली नाही. त्यातच अनेक वर्षांपासून महापालिकेच्या आस्थापनाचे आकृतीबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पडून आहे. त्यास मंजुरी मिळावी यासाठी महापौरांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांची त्यांनी तीन ते चार वेळा सतीश सोनवणे आणि जगदीश पाटील यांच्यासमवेत भेट घेऊन अडचणीदेखील मांडल्या होत्या. मुंबईचे महापौर म्हणून काम केल्याचा अनुभव असल्याने महापौरांना काम करताना किती अडचणी येतात, ते आपल्याला चांगले माहिती आहेे, असे सांगून भुजबळ यांनी मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागातील अति तातडीचे पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करू असे अश्वासन दिले होते. त्यानुसार पदे मंजूर झाल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
इन्फो...
आता अन्य पदे भरतीसाठीही मान्यता द्या
नाशिक महापालिकेचा आकृतीबंध शासनाकडे मंजुरीसाठी पडून आहे. आता त्यातील ६३५ पदांना मान्याता मिळाली असली तरी उर्वरित आकृतिबंध त्वरित मंजूर करावा, अशी मागणी महापौरांनी केली आहे. महापालिकेत १९९८ मध्ये भरती झाल्यानंतर गेल्या २० ते २२ वर्षात भरती झालेली नाही. त्यामुळे काम करणे कठीण होत आहे. त्यामुळे तातडीने सर्वच रिक्त पदे पालकमंत्री भुजबळ यांनी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.