नाशिक : महसूल विभागाच्या राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील भूमी-अभिलेखाच्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती माहिती कायमस्वरूपी जतन करून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी प्रायोगिक पातळीवर पाच तालुक्यांच्या काही निवडक गावांची निवड करण्यात आली आहे. माहितीच्या या संगणकीकरणाने भविष्यात मिळकतधारकांनाही आपल्या मालमत्तेचे संपूर्ण विवरण व त्याची स्थिती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महसूल विभागाने आपल्याकडील असलेल्या आजवरच्या दप्तराची छाननी केली असता, जवळपास एक कोटी ३४ लाख कागदपत्रांचे संगणकीय स्कॅनिंग करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी राज्य सरकारनेच निविदा काढून नाशिक जिल्ह्णासाठी मे. कार्वी डेटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी निश्चित केली आहे. गेल्या वर्षी मंत्रालयात लागलेल्या आगीत अनेक महत्त्वाच्या फायली जळून खाक झाल्यानंतर शासनाकडील दप्तराच्या सुरक्षिततेचा विषय सर्वत्र चर्चिला गेला; त्यातूनच हा प्रकल्प पुढे आला आहे. या संगणकीकरणात प्रत्येक सातबारा उतारा, तलाठ्यांकडील फेरफार नोंदवही, नमुना क, ड, ई पत्र, इनाम रजिस्टर, जन्म-मृत्यू नोंदणी आदि महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे. प्रत्येक गावनिहाय संगणकात ही माहिती व मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून साठवून ठेवण्यात येणार असून, त्यातही गटनिहाय, गावनिहाय, सातबारानिहाय अशा विविध सदरांखाली ही माहिती पाहता येणार आहे.
महसूल दप्तराचे स्कॅनिंग
By admin | Updated: July 29, 2014 00:55 IST