नाशिक : कॉलेजरोडवरील खुल्या जागेत पाळीव श्वानांसाठी उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेत मान्यतेसाठी मांडण्यात आला परंतु ज्यांनी पेटपार्कसाठी शिफारस केली त्या स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर माघार घेतल्याने प्रस्ताव चर्चेपूर्वीच रद्द करण्यात आला. अॅड होक पार्क कमिटीचे डॉ. दिग्विजय पाटील आणि नेहा गुप्ता यांनी कॉलेजरोडवरील नंदन स्वीट्समोर असलेल्या खुल्या जागेत पाळीव श्वानांसाठी पेटपार्क विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांबद्दल जागृती व प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जाणार होता. सदर पेटपार्क कॉलेजरोडवरील उद्यानाच्या जागेत होण्याकरिता स्थानिक नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि छाया ठाकरे यांनी प्रशासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या महासभेत सदरचा प्रस्ताव मांडण्यात आला असता शिवाजी गांगुर्डे यांनी सभागृहात निवेदन करत सदर पेटपार्कला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने प्रस्ताव रद्द करण्याची विनंती केली. तसेच सदर पेटपार्कसाठी शहराच्या बाहेर कुठेतरी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची सूचनाही केली. शिवाजी गांगुर्डे यांनी घेतलेल्या या भूमिकेने सभागृहही अवाक झाले आणि शिफारस करणाऱ्यांनीच माघारीचा प्रस्ताव दिल्याने हास्याचे फवारे उडाले. पाळीव श्वानांसाठी स्वतंत्र उद्यानाचा प्रस्ताव पहिल्यांदाच नाशिक महापालिकेसमोर आला होता. सदर पेटपार्क कॉलेजरोडवर विकसित केला जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला. या पेटपार्कमुळे सार्वजनिक स्वच्छतेला व नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त करत स्थानिक नगरसेवकांना जाब विचारला. नागरिकांच्या तक्रारीनंतर गांगुर्डे आणि ठाकरे यांच्यावर सदरचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढवली.
आधी शिफारस, नंतर माघार; पेटपार्कचा प्रस्ताव केला रद्द
By admin | Updated: November 21, 2015 00:08 IST