नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या कात्रीत अडकलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या सुमारे साडेतीन कोटींच्या जलसंधारण कामांच्या फेरनिविदा सोमवारी (दि.२७) काढण्यात आल्या आहेत. आचारसंहिता संपल्याने या निविदा काढण्यात येऊन मार्चच्या आत ही कामे पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न राहणार आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे २४ बंधाऱ्यांची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची कामे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली होती. ही कामे ३१ मार्च २०१७ अखेर होणे क्रमप्राप्त आहे. आता फेब्रुवारी महिना संपण्यास एकच दिवस बाकी असून, महिनाभरात ही कामे उरकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाला घाई करावी लागणार आहे. सोमवारी सकाळीच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्यात त्यांना शिल्लक निधीबाबत विचारणा केली. तसेच हा निधी मार्चअखेर खर्च करणे बंधनकारक असल्याने या निधीतून लवकरात लवकर आवश्यक ती विकासकामे करावीत, असे निर्देश दिले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे पश्चिम विभागाने प्रत्येकी सुमारे १५ लाखांची २४ कामांच्या फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. ही २४ कामे येत्या ३१ मार्चच्या आत करणे बंधनकारक आहे. अन्यथा हा निधी व्यपगत होणार आहे. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार कामांच्या फेरनिविदा
By admin | Updated: February 28, 2017 01:16 IST