सुरगाणा : तालुक्यातील पिंपळसोंड व उंबरपाडा येथे राजस्व अभियानांतर्गत शिधापत्रिकांचे नूतनीकरण करून आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले. शिधापत्रिकांचे नूतनीकरण करण्यासाठी तहसीलदार आर.डी. कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाध्यक्ष रतन चौधरी व गोंदुणेचे ग्रामपंचायत सदस्य तुळशिराम खोटरे यांच्या हस्ते राजस्व अभियानांतर्गत हडकाईचोंड येथे लोकाभिमुख गतिमान करण्यासाठी झालेल्या शिबिरात ३५१ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरात शिधापत्रिकांचे नूतनीकरणासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. सरकारी अथवा मुलांच्या शैक्षणिक कामासाठी पदोपदी मागितली जाणारी शिधापत्रिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राजीव गांधी आरोग्य विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी या शिधापत्रिकेचा सदुपयोग होत असतो. पिवळ्या व हिरव्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकाला शस्त्रक्रियांमध्ये विशेष सवलत देण्यात येते. शिधापत्रिकाचे महत्त्व केवळ रेशन अथवा केरोसिनपुरतेच मर्यादित नसून अनन्यसाधारण आहे.पिंपळसोंड हा भाग तालुक्यातील पश्चिमेला गुजरात सीमेवरील शेवटच्या टोकाला असून, अद्याप बस येथे जात नसल्याने नागरिकांना तहसील कार्यालयात अनेक खेटे घालावे लागत होते. एका शिधापत्रिकाधारकाला सात ते आठ वेळा चकरा मारून काम होत नसल्याने व शेतकरी व मजूरवर्गाचे काम बुडीत होत असल्यामुळे नवीन दुय्यम शिधापत्रिकेची प्रत मिळवून देण्याचा ध्यास घेतला. त्याची पूर्तता करून दिली आहे. आदिवासी फक्त नावाने ओळखले जातात. मात्र सरकार दरबारी खरी ओळख निर्माण व्हावी यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखले, भूमिहीन दाखले, जन्म प्रमाणपत्र, सातबारा खाते उतारा, अधिवास प्रमाणपत्र. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारचे दाखले काढून देण्यासाठी प्रयत्न करणार म्हणजे आदिवासींची खरी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शिधापत्रिकेच्या पूर्ततेसाठी तहसीलदार आर.डी. कचरे, नायब तहसीलदार आर.एम. गांगुर्डे, तलाठी के.टी. महाले, मंडल अधिकारी महाले यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
आदिवासी बांधवांना शिधापत्रिकांचे वाटप
By admin | Updated: July 25, 2016 23:45 IST