लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर येथे असलेल्या अमित वाइन शॉप या दुकानामुळे मद्यपींचा उपद्रव वाढल्याने परिसरातील संतप्त महिलांनी रविवारी सकाळी दारू दुकानासमोर थाळीनाद करून ठिय्या आंदोलन केले. या महिलांनी दारू दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. दिंडोरीरोडवर अमित वाइन हे दारू दुकान असून, या दुकानामुळे परिसरात मद्यपींची संख्या वाढत आहे. शिवाय दुकानासमोर शेंगा, फुटाणे विक्रीच्या हातगाड्या वाढल्या आहेत. मद्य खरेदीसाठी येथे येणाऱ्या मद्यपींचा महिला तसेच युवतींना उपद्रव होत आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. ज्या इमारतीत हे दारू दुकान आहे त्यातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. याशिवाय दुकानात येणारे मद्यपी आरडाओरड करून परिसरात अशांतता पसरवित आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील महिलांनी येथील दुकानांबाबत तक्रारी केल्या होत्या.महिलांची दुकानासमोर घोषणाबाजीदुकानासमोर मद्यपी वाहने उभी करत असल्याने त्याचा अन्य व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर परिणाम झाला आहे. शनिवारी दुपारी संतप्त महिलांनी दुकानासमोर घोषणाबाजी करून आंदोलन केले होते. परिसरातील या दारूविक्री दुकानामुळे नागरिकांना विशेषत: महिला वर्गाला त्रास सहन करावा लागत असल्याने दारू दुकान बंद करण्यासाठी परिसरातील महिलांनी रविवारी थाळीनाद करून आंदोलन केले.
शहरातील रणरागिणी सरसावल्या
By admin | Updated: July 17, 2017 00:18 IST