अझहर शेख
नाशिक : मुस्लिम बांधवांच्या सर्वांत मोठा रमजान ईदचा सण सोमवारी (दि. ३१) शहरासह जिल्ह्यात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी रविवारी (दि. ३०) शाही मशिदीच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या धर्मगुरूंच्या बैठकीत केली. शहरात ढगाळ हवामान असल्यामुळे चंद्र दर्शन स्पष्टपणे घडू शकले नाही. मात्र, वडाळ्यातील एका रंगरेज कुटुंबीयांनी काही सेकंदांसाठी चंद्रकोर प्रत्यक्षात बघितली. त्यांनी बैठकीत हजर राहून तशी ग्वाही दिली. याआधारे शहर-ए-खतीब यांनी ईद साजरी करण्याचा निर्णय सर्वांनुमते जाहीर केला.
रमजान पर्वचा आज, रविवारी (दि. ३०) २९ वा उपवास (रोजा) पूर्ण करण्यात आला. यानिमित्ताने चंद्र दर्शनाची दाट शक्यता वर्तविण्यात आली होती. चंद्र दर्शन घेण्याचा सायंकाळी समाजबांधवांनी पुरेपूर प्रयत्न केला. विभागीय चांद समिती व सुन्नी मरकजी सिरत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही शाही मशिदीच्या गच्चीवरून चंद्रदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ढगाळ वातावरणामुळे चंद्रकोर कोणालाही दिसून आली नाही. रात्री आठ वाजेच्या सुमारास वडाळ्यात राहणारे मन्सुर रंगरेज यांनी समितीच्या आवाहनानुसार संपर्क साधून धर्मगुरूंच्या बैठकीत याबाबत ग्वाही दिली.
याआधारे चंद्र दर्शन वडाळ्यात झाल्याचे जाहीर करत रमजान ईदचा सण सोमवारी साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा खतीब यांच्याकडून करण्यात आली. यावेळी मौलाना मुफ्ती सय्यद आसीफ इकबाल, मौलाना शाकीर रजा, मौलाना हाफिज अब्दुल जब्बार आदी उपस्थित होते.