नाशिकरोड : ‘प्रभू रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषात श्रीरामनवमीनिमित्त परिसरातून मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेली रामरथ शोभायात्रा उत्साहात पार पडली. श्रीरामनवमी व कामदा एकादशीनिमित्त देवळालीगाव सत्याग्रही चौकातील श्रीराम मंदिरापासून मंगळवारी सायंकाळी रामरथ शोभायात्रेचे उद्घाटन पंच कमिटीचे अध्यक्ष अॅड. शांताराम बापू कदम यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी नगरसेवक सूर्यकांत लवटे, सलीम शेख, नयना वालझाडे, मनोहर कोरडे, राजू लवटे, बाळनाथ सरोदे, प्रदीप देशमुख, प्रिन्सी लांबा, शिरीष लवटे, प्रमोद बुवा, अस्लम मणियार आदि मान्यवर उपस्थित होते. श्रीराम लिहिलेल्या भगव्या टोप्या घातलेले भाविक, युवक, कलशधारी महिला व शिवकालीन शस्त्राचे प्रात्यक्षिक दाखविणारे मुले-मुली शोभायात्रेचे आकर्षण ठरले होते.रामरथाला दोरखंड बांधून भाविक मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नामाचा जयघोष करीत रामरथाला पुढे ओढत होते. डिजेवर लावलेले प्रभू रामचंद्रांचे विविध गाणे, भजन व उपस्थित भाविकांवर-आजूबाजूला मारण्यात येणाऱ्या विविध रंगाच्या विद्युत प्रकाश झोतामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. गांधी पुतळा, सत्कार पॉर्इंट, अनुराधा चौक, दुर्गा उद्यान कॉर्नर, मुक्तिधाम, बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, गोसावी वाडी आदि ठिकठिकाणी भाविकांनी रामरथाचे फटाके फोडून जोरदार स्वागत केले. रामरथातील भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. देवळाली गावातील श्रीराम मंदिरात महाआरती करून रामरथ शोभायात्रेचा समारोप झाला.
नाशिकरोड परिसरातून रामरथ शोभायात्रा
By admin | Updated: April 1, 2015 01:30 IST