मुकुंद बाविस्कर : नाशिकआधुनिक तंत्र आणि यंत्र युगात ‘रामनाम’ मंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. किंबहुना आयुष्याच्या प्रारंभापासून ते अखेर श्वासापर्यंतच ‘रामनाम’च मनुष्याला तारून नेते असे सांगत अखंड भारतभ्रमण करीत रामनाम जपाचे महात्म्य पटवून देणारे अलौकिक योगीपुरुष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासण्याचे कार्य गंगापूररोडनजीकच्या चैतन्यनगरात अखंडपणे सुरू आहे. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता या उपासना यज्ञात रोज सहभाग घेत आहेत. योगीराज तुकामाई महाराज यांचे शिष्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची बुधवारी (दि. ८) जयंती असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे धार्मिक व आध्यात्मिक कार्य अलौकिक असून, त्यांनी देशभरात हजारो मंदिरे उभारून शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धारदेखील केला. नाशिकच्या काळाराम मंदिरालाही महाराजांनी भेट देऊन प्रवचन केले होते. केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक कार्यातही त्यांनी पुढाकार घेतला. दुष्काळात भुकेल्यांसाठी अन्नछत्र उघडले. आज शंभर वर्षांनंतरही त्यांच्या कार्याची परंपरा लाखो शिष्य, साधक, उपासक आणि अनुयायी यांच्याकडून सुरू आहे. नाशिक शहरात गंगापूररोडलगत गोदाकाठावर चैतन्यनगरात एक तपापूर्वी श्रीसदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज उपासना केंद्र व मंदिराची स्थापना करण्यात आली असून, केंद्रामार्फत भजन, कीर्तन, प्रवचन, गायन, पालखी मिरवणूक व महाप्रसाद आदि धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात. याशिवाय आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, अन्नदान, व्याख्यान आदि सामाजिक कार्यदेखील सुरू असते. कोणत्याही कर्मकांडात अडकण्याऐवजी परमेश्वराचा नामजप हाच सर्व मोठा यज्ञ आणि साधना आहे. ही ब्रह्मचैतन्य महाराजांची शिकवण आचरणात आणत या भागातील नव्हे तर शहरातील सुमारे तीनशे कुटुंबातील हजार साधकांकडून रामनाम जपाचा अखंड यज्ञ सुरू आहे.
रामनाम जपाची अखंड भक्तिसाधना
By admin | Updated: February 7, 2017 23:08 IST