नाशिक : कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या स्नानासाठी रामकुंड आणि सीताकुंड यांच्यात असलेली भिंत तोडून महापालिकेने ते प्रशस्त केले असून, त्यामुळे एकाच वेळी शेकडो साधू स्नान करू शकतील. तथापि, महापालिकेने दोन कुंडांचे अस्तित्व नष्ट करण्याच्या प्रकारामुळे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला. इतकेच नव्हे तर रामकुंडातील अरुणा कुंड महापालिकेने बुजवल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर सकाळी तीन तास पुरोहितांनी नदीपात्रात उतरून हे कुंड खुले केले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी ही कामे रोखण्याची मागणी केली आहे. पर्वणी तोंडावर असताना महापालिकेने आता प्रलंबित कामांना घाईघाईने हात घातला आहे. गेल्या कुंभमेळ्यात म्हणजेच २००२-०३ मध्ये कुंभमेळ्याच्या वेळी रामकुंड परिसरातील नऊ कुंडांचे एकत्रिकरण करून रामकुंडाचे विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता रामकुंडालगत असलेल्या सीताकुंडामध्ये असलेली भिंत तोडण्यास बुधवारी रात्री सुरुवात करण्यात आली. त्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर भल्या पहाटे हे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी कालरात्रीपासून गांधी तलावापासून सीताकुंडापर्यंत याचदरम्यान सकाळी रामकुंडावर आलेल्या पुरोहितांना रामकुंडाखाली असलेल्या पुरातन गोमुखाच्या ठिकाणी असलेले अरुणा कुंड महापालिकेने गाळ टाकून बुजवल्याचे आढळले. त्यामुळे पुरोहित संतप्त झाले. सर्व पुरोहितांनी रामकुंडात उतरून बुजवलेला नाला खुला केला. रामशेजवरून उगम पावलेली अरुणा नदी रामकुंडात गोदावरी नदीला मिळते. त्यामुळे गोदावरीचे महत्त्व असून, हे महत्त्वच नष्ट केल्याचा आरोप पुरोहितांनी केला आहे. सदरचा प्रकार घडत नाही तोच महापलिकेने रामकुंड आणि सीताकुंडाच्या दरम्यान असलेली भिंत तोडली. येथील नदी कुंड पुनरुज्जीवनाचा लढा देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गोदावरी नागरी सेवा समितीचे देवांग जानी यांनी त्यास विरोध केला. रामकुंड हे पुरातन असून, त्यासंदर्भात कोणतीही कृती करताना पुरातत्व खात्याची मंजुरी घेण्याची त्यांची मागणी होती. मनपाने दुर्लक्ष केल्याने आता न्यायालयीन लढाईत पालिकेच्या कारभाराला आव्हान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, मनपाने रामकुंड आणि सीताकुंडाचे एकत्रिकरण मागील कुंभमेळ्यातच केले होते. त्यानंतर २००५ मध्ये रामकुंड शुद्धीकरणासाठी केंद्र सुरू करण्यात आले त्यावेळी शुद्धीकरणप्रक्रिया सोपी व्हावी यासाठी मनपाने ही भिंत घातली होती. आता हीच भिंत काढून घेण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली.
रामकुंडाचे पुन्हा झाले विस्तारीकरण
By admin | Updated: August 14, 2015 00:19 IST