नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या २४ व्या दीक्षांत सोहळ्यात ताकवले यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. ताकवले यांनी मुक्त विद्यापीठाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली असून, सर्वसामान्यांपर्यंत मुक्त शिक्षण पोहचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकºयांच्या बांधापर्यंत शिक्षण पोहचविले तरच मुक्त शिक्षणाचा हेतू सफल होऊ शकेल, अशी भूमिका घेत ताकवले यांनी तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविली. डिस्टन्स लिर्निंग अभ्यासक्रम निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. मुक्त विद्यापीठ त्यांनी जनसामान्यांमध्ये रुजविल्याने त्यांच्या या कार्याची दखल विद्यापीठाकडून घेण्यात आली असल्याचे कुलगुरू वायुनंदन यांनी सांगितले. मुक्त विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. २६ रोजी विद्यापीठाच्या मुख्यालयात सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. या दीक्षांत समारंभात यंदा एक लाख ५४ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांना डी. लिट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने राम ताकवले यांना डी.लिट. देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:21 IST