रविवारी बाजार समितीत सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी ३५, कोथिंबीर (गावठी) ५०, कांदापात ४० तर शेपू ३२ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाली. पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस समाधानकारक पडला नसल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. त्यामुळे आवक काही प्रमाणात घटली आहे. परिणामी पालेभाज्यांचा बाजारभाव तेजीत आहे तर फळभाज्या आवक स्थिर असल्याने बाजारभाव टिकवून आहेत, असे व्यापारी वर्गाने सांगितले.
सोमवारी दुपारी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या दोडका जाळीला (प्रति १५) किलो ६५० ते ७०० रुपये, कारले (१२ किलो जाळी) ५०० रुपये, भोपळा (१८ नग) २५०, ढोबळी मिरची (१२ किलो) ३००, टोमॅटो (२० किलो जाळी) २५० रुपये तर लाल वांगी (१५ किलो) २५० रुपये या प्रमाणे दर मिळाला आहे. पालेभाज्या खरेदी करणारे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमालाची खरेदी करीत असल्यामुळे बाजार समितीत काही प्रमाणात पालेभाज्यांची आवक घटली आहे. बाजार समितीतून शेतमाल मुंबई व मुंबई उपनगर, गुजरात आणि इंदोर राज्यात रवाना केला जात आहे. आगामी काळात पावसाने हजेरी लावली नाही, तर पालेभाज्या व फळभाज्यांचा दर आणखी तेजीत येण्याची शक्यता असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.