नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच हवालदिल झाले होते. सर्वांच्या नजरा आकाशात दाटून येणाऱ्या ढगांवर खिळून राहत होत्या. मात्र ढगांची गर्दी ही हुलकावणी देत होती. अखेर वरुणराजाची नाशिकरांवर कृपादृष्टी होऊन मागील तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव सुरू झाला. बुधवारी संततधार शहरात मध्यरात्रीपासून संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे परिसर जलमय झाला होता. शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले हाेते. तसेच ठिकठिकाणी रस्ता खोदकामामुळे पावसाचे पाणी साचले होते. बकरी ईदची शासकीय सुटी असल्यामुळे चाकरमान्यांची पावसामुळे होणारी गैरसोय टळली. पावसाची दिवसभर संततधार सुरू राहिल्याने नाशिककरांना रेनकोटचा पुरेपूर वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अडगळीत पडलेले रेनकोटदेखील बाहेर आले.
--इन्फो--
हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस
बुधवारी मध्यरात्री तीन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहिल्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३.४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत १०.५ असा एकूण २३.९ मिमी इतका पाऊस शहरात पडला. संध्याकाळनंतरसुध्दा पावसाची संततधार ही कायम होती. हंगामात प्रथमच इतका पाऊस शहरात झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
--इन्फो--
उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव
पावसाच्या संततधारेमध्ये विजेचा लपंडाव पहाटेपासून काही उपनगरांमध्ये पहावयास मिळाला. कधी वीजपुरवठा खंडित तर कधी कमी व्होल्टेजने वीजपुरवठा अशी स्थिती वडाळावासीयांना ऐन सणासुदीच्या दिवशी अनुभवयास आली. या भागातील विजेचा लपंडावाची समस्या ही मागील काही दिवसांपासून कायम आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. काठेगल्ली, टाकळी रोड, अशोकामार्ग, पखाल रोड या भागातही अधूनमधून विजेचा लपंडाव रहिवाशांना अनुभवयास आला.
--इन्फो--
पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे
गंगापूर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८ मिमी इतका पाऊस गंगापूर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापूर धरणसमूहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल्याने धरणसाठा वाढू लागला असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.