नाशिकरोड : कसारा जवळील खर्डी येथे अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच रेल्वे सोमवारी सकाळपासून दीड-दोन तास उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले. सायंकाळपासून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे या थोड्याशा उशिराने धावत होत्या.कसारा व आसनगाव दरम्यान असलेल्या खर्डी येथे अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे मुंबई-नाशिक दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे टप्प्याटप्प्याने थांबवून मार्गक्रमण करत असल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.येणाऱ्या रेल्वे उशिरानेमुंबईहून सोमवारी सकाळी सुटलेली गीतांजली, वाराणसी सुपर, काशी, तपोवन, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, हरिद्वार, मुंबई-बरेली, पुष्पक, गोदान, आनंदवन, पवन, कामायनी या सर्व गाड्या दीड-दोन तास उशिराने धावत नाशिकरोडला पोहचल्या. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले होते. सायंकाळपासून मुंबईहून सुटलेल्या रेल्वे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा थोड्याशा उशिराने धावत असल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत होती. यामुळे प्रवाशांचे नियोजन चुकल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले होते. (प्रतिनिधी)
रेल्वे गाड्यांना विलंब
By admin | Updated: August 2, 2016 01:33 IST