चांदवड : चांदवड - देवळा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. राहुल दौलतराव अहेर यांनी राष्ट्रीय कॉँग्रेसचे उमेदवार आमदार शिरीषकुमार वसंतराव कोतवाल यांचा ११ हजार १६१ मतांनी पराभव केला. डॉ. राहुल अहेर यांना ५४ हजार ९४६ मते मिळाली.सकाळी ८ वाजता कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी खंडेराव मंदिर रोडकडील प्रशासकीय इमारतीतसुरू झाली. पोलिसांनी सर्वच वाहनांना मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला होता. तर प्रत्येक मतमोजणी अधिकारी, प्रतिनिधी, उमेदवार व प्रतिनिधीची काटेकोर तपासणी केली जात होती. मतमोजणीचे काम सुमारे १ वाजता संपले. डॉ. राहुल अहेर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, ते शेवटपर्यंत कायम राहीले. डॉ. राहुल अहेर यांच्या निवडीची घोषणा होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मत मोजणी दालनातच घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रशासकीय इमारतीपासून विजयी उमेदवारांची विजयी मिरवणुक खंडेराव मंदिर रोडने बसस्थानकाकडे नेण्यात आली, चांदवड शहरातून मिरवणुक काढण्यास मनाई असल्याने मिरवणुक होऊ शकली नाही. कार्यकर्त्यांनी ढोलताश्यांच्या निनादात, फटाक्याची आतिषबाजी करीत, पेढे वाटून आंनदोत्सव साजरा केला. यावेळी निवडणूक निरीक्षक स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे, सहायक निर्णय अधिकारी मनोज देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवार डॉ. राहुल अहेर यांना प्रमाणपत्र देण्यात आले. (वार्ताहर)
चांदवड - देवळा मतदारसंघात भाजपाचे राहुल अहेर विजयी
By admin | Updated: October 21, 2014 01:59 IST