वणी : तोतयागिरी करणाऱ्या राहुल आहेर याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून गेल्या २९ ऑगस्टपासून अटकेत असलेल्या राहुल आहेरला तीन वेळा न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्याने बनावट आमदारकीच्या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
विधानसभा उपाध्यक्ष व माजी आमदारांचे बनावट लेटरपॅड व बनावट ओळखपत्र तयार करून मंत्रालयातून अनुदान देण्याच्या नावाखाली अटकेत असलेल्या राहुलला रविवारी (दि.५) न्यायालयासमोर उभे केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तपास यंत्रणेच्या युक्तिवादाला यश आले आहे.
सलग तीन वेळा पोलीस कोठडी मिळाल्याने महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या प्रकरणाबाबत सखोल चौकशीची भूमिका घेतल्याने विविध अंगाने फसवणूक व बनावाटीकरण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
लोकमतने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून या प्रकरणात बडे मासे असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने संशयित राहुल आहेर याला पोलीस कोठडी मिळत असल्याने पोलिसांनी सबळ माहिती सादर केली असावी. प्रकरणाच्या तळाशी जात अजून काय माहिती पुढे येते याबाबत प्रतीक्षा आहे.