नाशिक : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत प्रतिमापूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाघ गुरुजी शाळा : मराठा विद्या प्रसारक संचलिक वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर या शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुखयाध्यापक वनिता पाटील, रंजना घुले यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. वैशाली मोरे यांनी महात्मा गांधीजींची जीवनचरित्रावर माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी रघुपती राघव राजाराम हे गांधीजींचे आवडते भजन म्हटले. सूत्रसंचालन तारामती बोनाटे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सुभाष वाचनालय : सुभाष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते एखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रास्ताविक मारुती तांबे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रभाकर खंदारे यांनी मानले. याप्रसंगी उपाध्यक्ष दत्ता शिंदे, सुनील शिंपी, रवींद्र बेलापूरकर, दिलीप तांबे, प्रकाश शिंदे, सुनीता शाहू त्याचप्रमाणे सचिन शिंदे आदि उपस्थित होते.