नाशिक : क्षेत्र नियोजन, ग्राम नियोजन हे अद्यापही जुन्या नियमांवर आधारलेले आहे़ आज वेळी आली आहे की, हे मापदंडच बदलावे लागणार आहेत़ यासाठी सर्व राज्यातील नागरिकांनीच यावर चर्चा व चिंतन करून मागणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी येथे केले़ गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास सभागृहात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आयोजित ‘नाशिक विकास आराखडा चिंता अन् चिंतन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते़ न्या़ जोशी, न्या़ शशिकांत सावळे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे, समितीचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, लेखक उन्मेश गायधनी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले़ न्या़ जोशी म्हणाले, अन्यायाचा प्रतिबंध हीच न्यायाची पहिली पायरी आहे़ जनतेसाठी करण्यात येत असलेल्या कामाचा कोणताही अहवाल गुप्त असू शकत नाही़ जर तो गुप्त ठेवला जात असेल तर ती गैरप्रकाराची सुरुवात असते़ यावर वेळीच आवाज उठविण्याची गरज आहे़ खटल्यांची संख्या वाढते आहे याचे दुसरे कारण लोकांमधील सामंजस्यपणा घटत चालला आहे़ यावेळी न्या़ सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कृती समितीने असेच कार्य सुरू ठेवण्याची सूचना केली़ याप्रसंगी आमदार सुधीर तांबे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सेनेचे दत्ता गायकवाड, नगरसेवक दामोदर मानकर, तानाजी जायभावे, गजानन शेलार, तानाजी फडोळ आदि उपस्थित होते़
नाशिक विकास आराखडा पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Updated: November 23, 2014 00:36 IST