नाशिक : भल्या पहाटेची वेळ. नुक्त्या पसरलेल्या धुक्याने वेढलेला गोदामाईचा प्रवाह. पक्ष्यांच्या किलबिलाटाशी स्पर्धा करणारा प्रसन्न, सळसळत्या जॉगर्सचा उत्साह आणि अशा देखण्या नेपथ्यामध्ये ‘दीपोत्सव’ या लोकमत समूहाच्या दिवाळी वार्षिकाचे प्रकाशन!!- हा देखणा योग गुरुवारी पहाटे गोदापार्क परिसरात जुळून आला आणि बहुप्रतीक्षित असा ‘दीपोत्सव’ नाशिक शहरी दाखल झाला.‘दीपोत्सव’चे प्रकाशन महापौर अशोक मुर्तडक, अशोका बिल्डकॉनचे अध्यक्ष अशोक कटारिया, पोलीस उपायुक्त विजय पाटील, विश्वास को-आॅप. बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, नगरसेवक विक्रांत मते, पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी अंकांची चाकोरी सोडून प्रयोगशीलतेचा आग्रह धरणारा हा दिवाळी अंक याहीवर्षी विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या ऐवजाने संपन्न आहे. जागतिकीकरणानंतरच्या ‘ग्लोबल’ भारताची ‘लोकल’ रहस्यं शोधत कन्याकुमारी ते श्रीनगर अशा प्रवासातले पस्तीस दिवस शब्दांकित करणारा ‘एन एच ४४’चा प्रयोग सर्वत्र वाखाणला जातो आहे. शिवाय रतन टाटा, प्रिसिला चान, प्रियंका चोप्रा, गिरिजा देवी, रस्किन बॉण्ड यांच्याशी ‘संवाद’ हेही या अंकाचे वैशिष्ट्य आहे.प्रास्तविक ‘दीपोत्सव’च्या संपादक अपर्णा वेलणकर यांनी केले. सूत्रसंचलन वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) पंकेश चंद्रात्रे यांनी, तर आभार सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी मानले. याप्रसंगी ‘दीपोत्सव’ अंकातील लेखकांचे प्रतिनिधी म्हणून ‘लोकमत’चे उप वृत्तसंपादक समीर मराठे, वंदना अत्रे, जगन्नाथ सांगळे व जॉगिंग करणारे नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रसन्न पहाटे गोदाकाठी ‘दीपोत्सव’चे प्रकाशन
By admin | Updated: October 21, 2016 03:15 IST